Close

June 23, 2020

मुरघास कसा बनवावा ?

मुरघास कसा बनवावा ? Silage Making procedure in Marathi
खालील लेख पॉवरगोठा PowerGotha च्या परवानगीने प्रसिद्ध केला आहे.
प्रत्यक्ष  मका लागवडीपासून ते बॅग किंवा खड्डा भरेपर्यंत  क्रमा क्रमाने कोणती कामे करावी लागतात – हे आपण पूर्ण तपशीलांसकट पाहू.
 

मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड 

प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू.
 

एका एकरात किती चारा तयार होतो ? 

एका एकर  जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो.
या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड च्या अनुभवातून लक्षात येते कि एका एकरात १८ ते २२ टन मुरघास बनेल इतका मका तयार होतो.
 

मक्याची लागवड कशी करावी ?

त्यासाठी आपण एका एकरात १० किलो मका पेरावा.  २ फूट रुंदीचे सरी घेऊन ८ इंचावर बी पेरावे.
 

किती दिवसात मक्याचे पीक मुरघास चाऱ्यासाठी तयार होते ?

पेरणीपासून साधारणतः ८०-९० दिवसांत मका पीक मुरघास बनविण्याच्या उद्देशासाठी अनुकूल होते.
 
 

मका मुरघासासाठी तयार झाला का हे कसे ओळखावे ?

मुरघास बनविण्यासाठी आपल्याला चिकातील मक्याची आवश्यकता असते.   बॅग किंवा बांधकामातील सायलेज  (मुरघास ) साठी ६०-६५% ओलावा असलेलं मक्याचे पीक गरजेचं असते.
आता हे ६५% ओलावा कसा काय बरं ओळखावा ?
तर मक्याचं कणीस आडवा कापल्यावर दुधाची रेघ दिसते (मिल्क लाईन )  ती मक्याच्या दाण्याच्या अर्धा आणि पाऊण भाग याच्या मध्ये असली पाहिजे.   तसेच  मक्याचा पाला हातात घेऊन चोळला तर ओल लागली पाहिजे.
मुरघास निर्मिती - मिल्क लाईन

मुरघास निर्मिती – मिल्क लाईन – चिकातील मका

ही वेळ पीक पेरणीपासून ८०-९० दिवसांत येते.

पीक कापले ! आता पुढे काय ?

पीक कापणीनंतर ओलाव्याचे अतिरिक्त प्रमाण असेल तर थोडा वेळ ते सुकू द्यावे.  २-३ तास सुकू द्यावे. कधी- कधी ४-५ तास सुद्धा वाळवावे लागते.   ओलावा किती आहे हे पाहून सुकविण्याचा काळ ठरवावा.
त्यानंतर  त्याची कडबा कुट्टी यंत्राने कुट्टी करावी. १-२ इंच बारीक तुकडे झाले पाहिजेत.
ह्या नंतर ती कुट्टी थेट बॅगेत किंवा बांधकामात भरावी.
लक्षात ठेवा! –> कोणत्याही परिस्थितीत कुट्टी केल्यानंतर चारा वाळू देऊ नये.  त्यातील पोषणमूल्ये नाश पावतात.
मोठा खड्डा किंवा बांधकाम असेल तर कुट्टी थेट बांधकामात किंवा खड्ड्यात पडली पाहिजे आणि लगेच हवाबंद करण्यासाठी तुडवली किंवा press केली गेली पाहिजे.

मुरघास मध्ये काय काय मी मिक्स करू ?

मुरघासाचे कल्चर (मिश्रण) उपलब्ध असल्यास ते तुम्ही त्यावर दिलेल्या सूचनांनुसार वापरू शकता.
याव्यतिरिक्त ईतर गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने वापर किंवा त्याबाबत चे अज्ञान यामुळे तुमचा मुरघास हमखास बिघडू शकतो.
म्हणूनच जर तुम्ही पहिल्यांदाच मुरघास बनविणार असाल तर मीठ, युरिया वगैरे काहीही त्यात टाकू नये.
फक्त आणि फक्त मक्याची कुट्टी बॅगेत किंवा बांधकामात टाकावी.
 

मुरघास निर्मिती – बॅगेत मुरघास भरताना !

या फोटोत दाखविलेल्या बॅग्स ६०० किलो च्या आहेत.  साधारणतः ५ फूट उंचीच्या आहेत.
मुरघास निर्मिती - बॅग मुरघास

मुरघास निर्मिती – बॅग मुरघास

त्यात कुट्टी भरताना फक्त १-२ फुटाचा थर टाकावा आणि त्यानंतर तो चांगल्या प्रकारे तुडवावा म्हणजे त्यातील हवा निघून जाईल.
तुडविल्यानंतर पुन्हा १-२ फूटाचा थर भरून पुन्हा तुडवावा.
अशा प्रकारे बॅग भरताना प्रत्येक थर तुडवला गेला पाहिजे म्हणजे हवा पूर्ण निघून जाण्यास मदत होते, आणि चारा सडण्याची भीती राहत नाही.
त्यानंतर बॅगेचे तोंड गोळा करून त्यावर आधी चिंधी बांधावी आणि त्यानंतर त्यावर रस्सीने बांधून बॅग पॅक करावी.  थेट रस्सी बांधल्याने बॅग कचून हवा आत घुसण्याची भीती असते.

मुरघास निर्मिती : खड्ड्यात मुरघास बनवताना 

३ ते ५ फूट खोल खड्डा खणून त्यात मुरघास बनवावा.   खड्डा खणताना काढलेली माती नंतर वर राहिलेल्याला थरावर झाकण्यासाठी उपयोगी पडते.
खड्ड्यात भरण्यापूर्वी, प्लास्टिक चा कागद अंथरावा.  मका पीक कुट्टी करून थेट खड्ड्यात पडला पाहिजे.
कुट्टी एका ठिकाणी आणि खड्डा लांब किंवा दुसऱ्या ठिकाणी असे करू नये.  पहिल्या प्रयत्नात कोणतेही अतिरिक्त पदार्थ मिसळू नये. फक्त कुट्टी केलेला मका.
खड्ड्यात मका पडल्यानंतर ट्रॅक्टर ने तो तुडवावा, प्रत्येक १-२ फुटाचा थर टाकला कि व्यवस्थित तुडवून घ्यावे, जेणेकरून हवा निघून जाईल.
खड्ड्याचे कोपरे किंवा जिथे ट्रॅक्टर पोचू शकत नाही अशा जागेवर माणसांनी स्वतः तुडवावे.
शेवटचा थर तुडवल्यानंतर प्लास्टिक कागदाने वरून झाकून घ्यावे आणि माती टाकून खड्डा संपूर्णतः झाकून घ्यावा.
पावसाचे पाणी साठणार नाही अशा ठिकाणीच खड्ड्यातील मुरघासाचे नियोजन करावे.
 

अहो, मी एका गाईला किती मुरघास चारावा? आणि मी वर्षभरासाठी किती चारा साठवून ठेवू ?

अंदाजे एका गाईला तिच्या वजनानुसार २० तें २५ किलो मुरघास रोज लागतो.
म्हणजे वर्षातील ३६५ दिवसासाठी ९१२५ किलो म्हणजे ९ टन चारा लागेल. ५०० किलोच्या १८ बॅग भराव्या लागतील.
म्हणजेच एका गाईच्या वर्षभराच्या हिरव्या चाऱ्याची सोय करण्यासाठी २० गुंठ्यांमध्ये मका पेरावा लागेल.  फक्त ६ महिन्यांसाठी नियोजन असेल तर १० गुंठे मका एका गाईसाठी पुरेल.
तुम्ही जर सायलेज किंवा मुरघास केला असेल किंवा करत असाल तर आम्हाला प्रतिक्रियांमधून कळवा.
अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पहा – बॅग मुरघास निर्मिती

तुम्ही समजावले, पण तरीही मुरघास बनविणे आम्हाला खूप किचकट वाटते. 

हरकत नाही !
तुम्ही या murghas.com  वरील मुरघास विक्रेते या लिंक वर जाऊन मुरघास खरेदी करू शकता.
या व्यतिरिक्त कोणत्याही शंकांसाठी या पेजवर खाली कॉमेंट क्षेत्रात प्रतिक्रिया लिहा.

 

 

गोठ्याचे उत्तम  व्यवस्थापन, जातिवंत गाय निर्मिती, सर्व प्रकारचा गोठ्यातील हिशेब, आणि दुग्धव्यवसाय संबधी माहिती, तसेच उत्पादने साठी खालील लिंक वरून पॉवरगोठा डेअरी फार्म मॅनेजमेंट ॲप  डाउनलोड करा.

डाउनलोड करा